Healthy Crispy Tasty Poha-Potato Nashta For Kids In Marathi
10 मिनिटात कुरकुरीत 1 कप पोहे+ 2 बटाटे नाश्ता मुलांच्यासाठी बनवला मुले खुश मिनिटात संपवला
आज मुलांसाठी पोहे व बटाटे वापरुन खूप छान टेस्टि नाश्ता बनवला. आपण हा नाश्ता इतर वेळी सुद्धा बनवू शकतो किंवा पाहुणे येणार असतील तरी बनवू शकतो. अश्या प्रकारचा नाश्ता बनवताना अगदी कमी तेल लागते, तसेच खूप खमंग सुद्धा लागतो.
आपण नेहमी इडली-वडा किंवा बटाटे वडा बनवतो, पण अश्या प्रकारचा नाश्ता बनवला तर बटाटे वडा विसरून जाल, तसेच आपण 5 मिनिटात 10-12 एकाच वेळी कचोरी टाइप हा नाश्ता बनवू शकतो.
साहित्य:
सारणासाठी साहित्य:
2 बटाटे (उकडून,किसून)
1 छोटा कांदा (चिरून)
1 टी स्पून आल-लसूण पेस्ट
2 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून लिंबुरस
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
7-8 कडीपत्ता पाने
आवरणा करिता:
1 कप पोहे
1 टे स्पून बेसन
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
तेल फ्राय करण्यासाठी

कृती: सारणांसाठी: प्रथम बटाटे उकडून, सोलून किसून घ्या, कांदा, कोथिंबीर चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. बटाट्याला मीठ लिंबुरस लाऊन बाजूला ठेवा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी,जिरे,हिंग,कडीपत्ता घालून चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून उकडलेले बटाटे घालून मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्या, मग कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. मग एकसारखे 10 छोटे छोटे गोळे बनवा.
आवरणासाठी: एक बाउल घेऊन त्यामध्ये पोहे घेऊन 2-3 वेळा पाण्यानी धुवून 5 मिनिट बाजूला ठेवा, मग त्यामध्ये बेसन, मीठ, लाल मिरची पावडर, चिलीफ्लेस्क, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्या. मिश्रण थोडेसे सैलसर पाहिजे गरज पडल्यास परत पाण्याचा हबका मारा. मग चांगले मळून एकसारखे 10 गोळे बनवून घ्या.
आता पोह्याच्या मिश्रणाचा एक गोळा घेऊन हातांनी दाबून थोडा थापुन त्याला वाटी सारखा आकार देवून त्यामध्ये बटाट्याचा सारणाचा एक गोळा ठेवून पोह्याच्या मिश्रणाने बंद करून गोल आकार द्या, अश्या प्रकारे सर्व गोळे बनवून घ्या.
आप्पे पत्र तेल लाऊन गरम करायला ठेवा, मग त्यामध्ये एक एक गोळा ठेवून बाजूनी थोडे तेल सोडून 3-4 मिनिट मध्यम विस्तवावर भाजून घ्या, मग उलट पलट करून तेल टाकून छान कुरकुरीत भाजून घ्या.
आता गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.