कोंकणी पद्धतीची ओल्या हरबऱ्याची आमटी | झणझणीत सोलाण्याची आमटी | Harbara Amti
Tasty Spicy Konkani Style Olya Harbharyachi Amti In Marathi
आता थंडीच्या सीझनमध्ये बाजारात आपल्याला ताज्या ताज्या हरबऱ्याच्या जुडया दिसतात. मग आपल्याला बघताच क्षणी घ्याव्याश्या वाटतात. ओले ताजे हरबरे चवीला छान लागतात.
आज आपण कोंकणी पद्धतीने ओल्या हरबऱ्याची आमटी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहू या. कोंकणी पद्धतीने म्हणजे त्यामध्ये ओले खोबरे आलेच.
साहित्य:
1 वाटी ओले ताजे हरबरे (सोलून)
1 मोठ्या आकाराचा कांदा (बारीक चिरून)
1 मध्यम आकाराचा टोमॅटो (बारीक चिरून)
1 टे स्पून आल-लसूण (कुटून)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1/4 वाटी ओला नारळ (वाटून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने

कृती: प्रथम हरबरे सोलून, कुकरमध्ये 2 शिट्या काढून घ्या. आपण वरण-भाताचा कुकर लावतो तेव्हा त्यावर ठेवले तरी चालेल. मग थंड झाल्यावर मिक्सरमद्धे फक्त एकदा थोडेसे म्हणजे जाडसर ब्लेंड करून घ्या. कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. ओले खोबरे बारीक वाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी-जिरे, हिंग व कडीपत्ता घालून मग बारीक चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिट परतून घ्या, आता आल-लसूण-हिरवी मिरची व चिरलेला टोमॅटो घालून 2 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर व गोडा मसाला घालून चवीने मीठ घालून एक मिनिट परतून त्यामध्ये ओले हरबरे घालून मिक्स करून गरम वाटेल तेव्हडे पाणी घालून मिक्स करून कढईमध्ये झाकण ठेवून 5-7 मिनिट मंद विस्तवावर आमटी शिजवून घ्या. मग कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम ओल्या हरबऱ्याची आमटी भाता बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
