एकदा असा झटपट नाश्ता बनवला बघताच क्षणी मग मुलांनी डब्बा मिनिटात फस्त केला
New Trick For Masala Dosa For Kids Tiffen In Marathi
मुलांचा शाळेचा डब्बा किंवा त्यांच्या साठी रोज नवीन नाश्ता बनवायचा म्हणजे प्रश्न असतो. आपण नेहमी इडली, डोसा उत्तपा बनवतो, मग नेहमी तेच तेच खाऊन मुलांना कंटाळा येतो.
आज आपण त्यामध्येच एक ट्रिक वापरुन नाश्ता बनवणार आहोत मुले तर अगदी खुश होतील. आपण अश्या प्रकारचा नाश्ता मुलांना शाळेत जाताना किंवा घरी सुद्धा देवू शकतो. करून बघा मुले अगदी मिनिटात संपवतील.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 12 बनवतात
साहित्य:
2 कप इडली किंवा डोसा पीठ
मीठ चवीने
तेल फ्राय करण्यासाठी
सारणा करिता:
2 मध्यम आकाराचे बटाटे
1 छोटा कांदा (चिरून)
2 हिरव्या मिरच्या
2 लसूण पाकळ्या
1/2” आले तुकडा
1 टी स्पून लिंबुरस
2 टे स्पून कोथिंबीर
मीठ चवीने
फोडणी करिता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
7-8 पाने कडीपत्ता

कृती: प्रथम इडली किंवा डोशाचे पीठ घ्या, बटाटे उकडून, सोलून, कुस्करून घ्या, कांदा चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. कुस्करलेल्या बटाट्याला लिंबुरस व मीठ लावून मिक्स करून बाजूला ठेवा.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या, मग त्यामध्ये आल-लसूण-हिरवी मिरची घालून एक मिनिट परतून त्यामध्ये हळद घालून मिक्स करून त्यामध्ये बटाटे व कोथिंबीर घालून मिक्स करून 2-3 मिनिट भाजी परतून घ्या. मग विस्तव बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर लिंबा एवहडे छोटे छोटे गोळे बनवा.
आता नॉनस्टिक आप्पे पत्र घेऊन त्याला थोडे तेल लावून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा, मग त्यामध्ये 1 टे स्पून इडलीचे पीठ घालून एक बटाट्याचा गोळा ठेवून त्यावर परत थोडे इडलीचे पीठ घालून बाजूनी थोडे तेल सोडा. मग 2-3 मिनिट झाकण ठेवून मंद विस्तवावर भाजून घेऊन मग उलट करून थोडेसे तेल सोडून परत 1-2 मिनिट भाजून घ्या.
आता गरम गरम मसाला डोसा नवीन पद्धतीने टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.