पान लाडू: पान लाडू हा एक छान नवीन पदार्थ आहे. पान लाडू हा आपण जेवण झाल्यावर मुख शुद्धी साठी घेवू शकतो. हा लाडू बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकनट, कंडेन्स मिल्क विड्याचे पान, बडीशेपव रोझ इसेन्स वापरले आहे. आपण सणासुदीला गोड जेवण झालेकी पान घेतो त्या आयवजी पान लडू खाऊन बघा सगळ्यांना खूप आवडेल. विड्याचे पान हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे त्यामुळे आपली पचन शक्ती चांगली होते व तसेच विड्याच्या पानात कॅल्शियमपण भरपूर प्रमाणात असते.
कंडेन्स मिल्क आपण घरी बनवू शकतो कारण बाजारात खूप महाग आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: १५ लाडू
साहित्य:
२५० ग्राम किंवा २ कप फ्रेश डेसिकेटेड कोकनट
१/२ पेक्षा थोडेसे जास्त कप कंडेन्स मिल्क
५ मोठी ताजी विड्याची पाने
१ टी स्पून बडीशेप (कुटून)
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून गुलकंद किंवा १/२ टी स्पून रोझ इसेन्स
१ टी स्पून तूप
२ टे स्पून दुध
२-३ थेंब खायचा हिरवा रंग
२ टे स्पून डेसिकेटेड कोकनट पान लाडूला वरतून लावण्यासाठी

कृती:
प्रथम कंडेन्स मिल्क बनवून घ्या. बडीशेप कुटून घ्या. विड्याची पाने धुवून पुसून कोरडी करून चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात विड्याची पाने, कंडेन्स मिल्क, दुध, हिरवा रंग व गुलकंद किंवा रोझ इसेन्स बारीक वाटून घ्या.
एका कढई मध्ये तूप गरम करून डेसिकेटेड कोकनट मंद विस्तवावर १०-१२ मिनिट भाजून घ्या. मग त्यामध्ये वाटलेले विड्याचे मिश्रण, बडीशेप, वेलचीपूड घालून परत ५ मिनिट मंद विस्तवावर भाजून घेवून कढई उतरवून मिश्रण थंड करायला ठेवा. मग त्याचे १५ लहान लहान गोळे बनवून घ्या. एका प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकनट घेवून हे गोळे त्यामध्ये घोळून घ्या.
पान लाडू बनवून झाले की स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये छान थंड करायला ठेवा व जेवण झाल्यावर सर्व्ह करा.
टीप: कंडेन्स मिल्क बनवतांना अर्धा लिटर दुध गरम करून त्यामध्ये ३/४ कप साखर व एक चिमुट खायचा सोडा घालून घट्ट होईस्तोवर आटवून घ्या.