कुरकुरीत साबुदाणा पापडी: साबुदाणा पापडी ही आपल्याला उपासासाठी बनवायला छान आहे.
उन्हाळा आला की महाराष्ट्र मधील लोणची, पापड, कुरडया, पापड्या अश्या प्रकारचे वर्षभराचे पदार्थ बनवून ठेवत असतात म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतात. पण आजकाल बरेचजण वेळे अभावी बाजारातून आणणे पसंद करतात.
मला वाटत की ह्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत तसेच आपण घरी बनवल्यामुळे स्वस्त व मस्त सुध्दा आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ६०-७० पापड्या बनतात
साहित्य:
२ कप साबुदाणा
५ कप पाणी
मीठ चवीने
१ १/२ टे स्पून जिरे
प्लास्टिक पेपर पापड्या घालायला
![Sabudana Papad](https://www.royalchef.info/wp-content/uploads/2018/03/SAM_4490-300x225.jpg)
कृती: सर्व प्रथम रात्री एका मोठ्या बाऊल मध्ये साबुदाणा धुवून त्यामध्ये साबुदाणा बुडेल एव्ह्डे पाणी घालून झाकून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी एका जाड बुडाच्या भांड्यात ५ कप पाणी गरम करायला ठेवा. पाणी चांगले गरम झाले की त्यामध्ये मीठ व भिजवलेला साबुदाणा घालून विस्तव मंद करून हलवून घ्या. मिश्रण घट्ट व्हायला आले की त्यामध्ये जिरे घालून मिक्स करून १ मिनिट वाफ येऊ द्या.
एक प्लास्टिक पेपर वर एका चमचा घेऊन मध्यम आकारच्या पापड्या पसरवून घाला. मग प्लास्टिक पेपर कडकडीत उन्हात ठेवा. संध्याकाळी पापड्या उलट्या करून प्लास्टिक पेपर झाकून ठेवा. परत दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात ठेवा. ह्या पापड्या चांगल्या उन्हात वाळल्यावर मग डब्यात भरून ठेवा.
आपल्याला उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा तळून खाता येतात.