Pitru Paksha Special Rice Kheer Recipe In Marathi
पितृ पक्ष स्पेशल पारंपरिक तांदळाची खीर, पितर खुश होऊन आशीर्वाद देतील
आता पितृ पक्ष चालू आहे, त्यामुळे आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यासाठी आपल्याला ताट ठेवावे लागते, त्यासाठी खीर ही पाहिजेच.
आपण तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत. अश्या प्रकारची तांदळाची खीर बनवली तर आपले पितर खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतील.
साहित्य:
1/4 वाटी तांदूळ बासमती किंवा आंबेमोहर
1 टे स्पून तूप
2 1/2 कप दूध (फूल क्रीम)
1/2 वाटीला थोडी कमी साखर
1 टी स्पून वेलची पावडर
काजू,बदाम,पिस्ते, किसमिस

कृती:
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिट तसेच पाण्यात ठेवा. मग पाणी काढून मिक्सरच्या जार मध्ये जाडसर वाटून घ्या. दूध गरम करून घ्या. ड्रायफ्रूट चिरून घ्या, केशर गरम दुधामध्ये भिजत ठेवा.
जाड बुडाच्या कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये जाडसर वाटलेले तांदूळ घालून 2 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये तापवलेले दूध घालून मिक्स करून मंद विस्तवावर 7-8 मिनिट गरम करून घ्या, म्हणजे तांदूळ शिजले जातील.
आता दूध आटवून झालेकी त्यामध्ये साखर घालून मिक्स करून 2-3 मिनिट परत गरम करून घ्या, आता त्यामध्ये केशरचे दूध, वेलची पावडर व चिरलेले ड्रायफ्रूट घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
आता गरम गरम तांदळाची खीर भोग म्हणून दाखवा.