टिप्स अँड ट्रिक्स: कपड्यावरील 20 प्रकारचे डाग काढण्याची झटपट सोपी घरगुती उपाय भाग – 1
Tips & Tricks: How To Remove 20 Types Of Stains From Cloths At Home In Marathi
कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतांना आपल्या कपड्यांवर काही ना काही डाग पडतात. किंवा आपण पार्टीला किंवा समारंभाला जातो तेव्हा चुकून कपड्यावर डाग पडतात. तर ते डाग कसे काढायचे ते आपण बघुया. अगदी सोपी डाग काढण्याची सोपी पद्धत आहे ते सुद्धा घरगुती समान वापरुन आपण घरच्या घरी डाग काढू शकता.
डागाचा प्रकार किंवा डागाचे नाव – त्यासाठी काय साधन आहे – व तो पडलेला डाग कसा काढायचा
1) तेल व तूप (ऑईल)
तेल व तूप याचा तेलकट डाग
टाल्कम पावडर किंवा कणिक वापरावी
प्रथम डाग कणिक किंवा टाल्कम पावडर टाकून पुसून घ्या. डाग जुना असला तर त्याला उलट्या बाजूनी इस्त्री करायची मग त्यावर टाल्कम पावडर टाकायची म्हणजे टाल्कम पावडर तेल अथवा तूप शोषून घेईल मग डाग धुवून काढायचा.
2) हळदीचा डाग
भाजी किंवा आमटीचा पिवळा डाग
साबण किंवा ऊन
हळदीचा डाग पडलेला कपडा उन्हात वाळत घातला असता उडून जातो. डाग धुतल्यावर नंतर जर गुलाबी झाला व कपडा उन्हात वाळत घातला असता निघून जातो. जर नाही गेला तर डागावर साबणाची पेस्ट लावावी मग वाळल्यावर डाग धुवावा.
हळदीचा डाग पडलेला कपडा मिठाच्या गार पाण्यात भिजत ठेवून मग धुतला तर जातो.
3) फळांचा किंवा फळांच्या रसाचा डाग
ग्लिसरीन किंवा मीठ
डागावर मीठ चोळावे आणि नाही गेलातर पसरट बशीत डाग ठेवून त्यावर ग्लिसरीन टाकावे. व २४ तास डाग तसाच भिजत ठेवावा मग कपडा धुवावा.
4) चहा, कॉफी व कोकोचा डाग
बोरँक्स पावडर वापरावी
डाग पडलेला कपडा प्रथम स्वच्छ धुवून घ्या मग जेथे डाग पडला असेल तेथे बोरँक्स पावडरची पेस्ट लावावी किंवा फळाचा डाग काढण्या साठी जी पद्धत वापरली जाते ती पद्धत वापरावी.
5) आईस्क्रीमचा डाग
बोरँक्स पावडर वापरावी
प्रथम डाग स्वच्छ धुवून घ्यावा मग बोरँक्स पावडरच्या पाण्यात डाग १०-१५ मिनिट भिजत ठेवावा. मग धुवावा.
6) अंड्याचा डाग
मीठ वापरावे
मीठ्च्या थंड पाण्यात १०-१५ मिनिट डाग भिजत ठेवावा मग धुवावा.
7) दुधाचा डाग
साबण, कणिक किंवा टाल्कम पावडर
साबणानी डाग धुवून जातो अगर नाही गेला तर कणिक किंवा पावडर चोळावी मग डाग धुवावा.
8) पानपट्टीचा डाग म्हणजेच खायच्या पानाचा डाग
चुना वापरावा
प्रथम डाग धुवून घ्यावा मग डागावर चुन्याची पेस्ट लावावी वाळल्यावर डाग धुवावा.
9) गरम इस्त्रीचा डाग
पावाचा मधला भाग
डाग पडलेल्या भागावर पावाचा मधला भाग ओला करावा व डागावर लावून सुकत आल्यावर धुवावा.
10) चिखलाचा डाग
पावसाळ्यात कपड्यावर नेहमी चिखलाचे डाग पडतात किंवा लहान मुले बागेत खेळायला जातात तेव्हा त्याच्या कपड्यावर चिखलाचे डाग पडतात.
कच्चा बटाटा वापरावा
डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावावा थोडा वेळाने डाग धुवावा.
11) रक्ताचा डाग
लहान मुले खेळतांना नेहमी पडतात व त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग पडतात.
मीठ वापरावे
रक्ताचा डाग ओला असतांनाच लगेच धुवावा. डाग धुतल्यावर काळसर किंवा पिवळट झालातर मिठाच्या गार पाण्यात डाग १०-१५ मिनिट भिजत ठेवावा मग धुवावा. घामाचे पिवळे डाग मिठाच्या गार पाण्यानी जातात.
12) लिपस्टिकचे डाग
स्त्रीयांचा हा नेहमीचा प्रश्न आहे की लिपस्टिकचे डाग कसे काढावे.
साबण वापरावा
लिपस्टिकचे डाग हा साबणाच्या गरम पाण्यानी धुवावा न गेल्यास तेलाच्या डागाप्रमाणे काढावा.
13) सायकलचे वंगण
लिंबू वापरावे.
डागावर लिंबू चोळावे. मग डाग धुवावा.
14) शाईचा डाग
मुले शाळेत पेननी लिहितात तेव्हा कपड्यावर नेहमी डाग पडतात.
लिंबू, मीठ वापरावे
डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून घ्यावा.
15) बॉलपेनची शाई किंवा नेलपेंटचा डाग
स्पिरिट किंवा अँसिटाँल वापरावे
डाग पडलेला भाग थोडा खरडावा मग पाठीमागून डावाला इस्री मारावी व वरतून स्पिरिट किंवा अँसिटाँल लावावे मग डाग धुवावा.

16) गंजचा डाग
मीठ व लिंबू वापरावे, अँकझाँलिक अँसिड, मिल्कद्वा
मीठ व लिंबू डाग पडलेल्या भागावर लावावे व मग डाग धुवून घ्या अगर नाही गेला तर अँकझाँलिक अँसिड, मिल्कद्वा डाग धुवून मग लावावे वाळल्यावर डाग धुवून घ्या.
17) आयोडीन बेनझाँईडचा डाग
लिंबू, खायचा सोडा किंवा स्पिरिट वापरावे
डागावर लिंबू चोळावे किंवा खाण्याचा सोडा घेवून त्याची पेस्ट करून डागावर चोळावी मग डाग धुवून घ्यावा. किंवा स्पिरिट लावावे.
18) डांबर, ग्रीस, ऑईलचा डाग
रॉकेल, पेट्रोल टरपेनटाईन वापरावे
डाग थोडा खरवडून घ्यावा व मागच्या बाजूनी इस्त्री करावी मग डाग पिवळट पडल्यास डाग रॉकेल, पेट्रोल टरपेनटाईन मध्ये थोडा वेळ भिजत ठेवावा मग धुवावा.
19) आँईलचा डाग
एमराँल वापरावे
डाग ओला करून घ्या व डागावर कोरड्या कापडाने एमराँल लावावे मग डाग धुवावा.
20) कपड्याला लागलेला दुसरा रंगाचा डाग
हायड्रो स्ल्फ़ाईड वापरावे
पाण्यात एक चमचा हायड्रो स्ल्फ़ाईड घालावे मग डाग पडलेला भाग त्या पाण्यात भिजत ठेवावा मग धुवावा. हा डाग पडल्यावर १०-१२ दिवसात डाग धुवावा. तसेच हे अँसिड पाण्यात घालून मगच वापरावे तसेच डायरेक्ट वापरू नये.